Bye bye lake Victoria | Pravin Mankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • ९३।शेवटची हाक
    ज्या व्हिक्टोरिया लेक वर मी बारा वर्षे रेंगाळलो त्याला आज मी शेवटची हाक मारली, याची देही याची डोळा सरोवराचे भव्य रूप मनात भरून घेतले - आणि राम राम केला त्या गोड पाण्याला. लाटांचे आवाज ऐकले अन निघालो. हिप्पो सुद्धा भेटले. उद्या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरु होणार. मोम्बासा. किसुमु येथील लेक व्हिक्टोरिया ते मुम्बासाचा अरेबियन समुद्र - अंतर फक्त ८२७ किलोमीटर. गोड पाणी ते खारं पाणी.
    लेक व्हिक्टोरियाचा अन माझा संपर्क - स्पर्श अवचित आला. २००० मध्ये बॉस ने सांगितलं की तुला मुवान्झाला जावं लागेल काही स्पेअर्स घेऊन. तू असं कर - पोर्ट बेल ला जा, इथे कंपाला जवळ जेट्टी आहे अन तिकीट बुक कर. मी अचानक अति उत्साहात आलो. उल्का अन इतर साथीदार यांची पण तिकिटं बुक केली. मोठी बोट बघितली. मोठी म्हणजे किती ? पूर्ण अकरा वॅगन्स ची रेल्वे गाडी बसेल इतकी मोठी. ज्या दिवशी प्रवास करायचा त्या दिवशी पोर्ट बेल ला तीन वाजता पोहचलो. इम्मीग्रेशन केलं अन बोटीवर आलो. ही बोट कार्गो शिप असल्याने प्रवासी नाही कुणी. आम्हांला प्रवेश मिळाला कारण आम्हीं खूप सामान घेऊन चाललो होतो. आमचा इन्शुरन्स नव्हता. मी बोटीत शिरल्यावर आत चक्कर मारली. बोटीत रेल्वेचे रूळ बसवले होते. जमिनीवरचे रूळ अन बोटीवरचे रूळ समांतर केले अन अकरा वॅगन्स बोटीत आल्या - पाच मिनिटात. बोट चारला निघाली. आमचा लेक विक्टोरियातून प्रवास सुरु झाला. आम्हांला केबिन दिली होती पण आम्हीं रात्र डेक वर काढली. अपूर्व शांतता. शांत पाणी. बोट हळू हळू हालत होती. थंड वारा त्वचेस स्पर्श करत होता. अंग आणि मन शहारलं होतं. तो प्रवास वेगळाच होता. रात्री बारा वाजता चंद्र दिसला. त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. ते कॅमेराबद्घ करता आले नाही कारण रात्र होती.
    लेक व्हिक्टोरिया फेरी ही मोटार जहाजे आहेत (पूर्वीची उदाहरणे स्टीमबोट्स ) व्हिक्टोरिया तलावावर युगांडा, टांझानिया आणि केनिया दरम्यान मालवाहू किंवा वाहने किंवा प्रवासी वाहून नेणारी फेरी सेवा देण्यात येते. आमच्या बोटीचं नाव सेरेंगेटी होते - कंपाला, युगांडा ते मुवान्झा, टांझानिया.
    आम्हीं सकाळी मुवान्झा ला पोहचलो. दोन मिनिटात अकरा वॅगन्स जमिनीवर आल्या. जेम्स आला होता. म्हणाला ' मिस्टर मानकर मला सगळे पास्पोर्ट्स द्या अन हॉटेल वर जा. आम्हीं गेलो. इम्मीग्रेशनचं काय हा प्रश्न मी नाही विचारला. दुपारी दोन वाजता जेम्स आला - सर्व पासपोर्ट्स वर एन्ट्री स्टॅम्पिंग झालं - वर्षासाठी आमचं वर्क परमिट पण झालं - कागदोपत्री टोटल सहाशे डॉलर्स झाले होते. मी जेम्सला हजार डॉलर दिले कारण त्याने मागितले. लोकांना खायला प्यायला लागतं म्हणे. कॉस्ट ऑफ कम्फर्ट चारशे डॉलर.
    बोटीचा प्रवास मस्त झाला. जेव्हां जेव्हां मी व्हिक्टोरिया बघतो तेंव्हा तेंव्हा मला माझा प्रवास आठवतो.
    लेकमध्ये अनेक बोटीच्या आपत्ती घडल्या आहेत, ज्यात गर्दीने अनेकदा भूमिका बजावली आहे. १९९६ मध्ये, एमव्ही बुकोबा व्हिक्टोरिया तलावावर उलटून ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या शतकातील ही सर्वात वाईट फेरी आपत्ती होती. अतिशय गावठी पद्धतीने बोटी चालवल्या जातात. एकदा तर दोन बोटी समोरासमोर येऊन आदळल्या अन बुडाल्या. अर्थात तेंव्हा अंधार होता म्हणून दुर्घटना घडली असेल. याचे एकूण क्षेत्रफळ ६८,८०० चौरस कि मीटर आहे आणि जास्तीत जास्त ८० मीटर खोलीसह ते तुलनेने उथळ आहे. या खोऱ्यात ३० दशलक्षाहून अधिक लोक राहतात. गर्दी होणारंच.
    आज खूप आठवणी समोर येत आहे , निरोप घेतांना. तिलापिया मासा ताजाताजा खाणं, लेकच्या किनाऱ्यावर बसून , किंवा ६६५० किलोमीटर वाहणारी नाईल नदीचा उगम बघणं , किंवा मूर्चीसन फॉल्स वर पहुडलेल्या शेकडो मगरी बघणं, किंवा महात्मा गांधींच्या पुतळ्याचं दर्शन घेणं जिंजा येथे .... अनेक आठवणी.
    बाय बाय ...

КОМЕНТАРІ •