कर्णबधीर-मुकबधीर मुलांची अनोखी सहल.. || Shahu Youth Foundation, Kolhapur
Вставка
- Опубліковано 18 січ 2025
- त्यांचं बोलणं आम्हाला समजून गेलं,
आमचं बोलणं त्यांना उमजून गेलं..!
त्यांच्या निखळ हसण्यानं,
आमचं मन गलबलून गेलं...!!!
कर्णबधिर मुला-मुलींचा 'किल्ले विजयदुर्ग' अभ्याससहल संपन्न...
वर्धापनदिनानिमित्त शाहू युथचा अनोखा उपक्रम:
१२ जानेवारी म्हणजे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा हा जन्मदिवस आमच्या शाहू युथ फौंडेशनचा वर्धापनदिन. त्यानिमित्त आम्ही यावर्षी कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपतींच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या एका गडकिल्ल्याचा अभ्यासदौरा व सहलीचे आयोजन केले होते. सोमवार दि. ०७ जाने २०१९ रोजी आम्ही आयोजित केलेल्या कोल्हापूरातील विनयकुमार लोहिया कर्णबधीर विद्यालय या शाळेतील कर्णबधिर-मूकबधिर विद्यार्थ्यांसाठीची "विजयदुर्ग" किल्ला अभ्यासदौरा व सहल यशस्वीरीत्या व आनंदात पार पडली.
कोल्हापूर पासून जवळचे ठिकाण तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, सुस्थितीत असलेली तटबंदी व वास्तू आणि समुद्रकिनारा याचा विचार करून या दौऱ्यासाठी आम्ही विजयदुर्ग किल्ला निवडला. या अभ्यासदौरा सहलीमध्ये शाळेचे ४४ विद्यार्थी-विद्यार्थिनी, ८ शिक्षक व कर्मचारी तसेच फौंडेशनचे १८ शिलेदार सहभागी झाले होते.
सकाळी ६.३० वा. शाळेच्या दारातून श्री. भाऊ घोडके व उपस्थित पालक व शिक्षक यांच्या हस्ते गाडीची पूजा व श्रीफळ वाढवून दौऱ्याला सुरुवात झाली. गगनबावडा येथे जिव्हाळा रिसॉर्टमध्ये विद्यार्थ्यांना चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. ११.३० वा. विजयदुर्ग येथे पोहोचल्यानंतर किल्ला भ्रमंतीला सुरुवात झाली. फौंडेशनचे इंद्रजीत माने यांनी किल्ल्याचा इतिहास, प्रत्येक ठिकाणावर म्हणजे अगदी प्रवेशद्वार, देवड्या, जंग्या, दारूगोळाकोठार, तोफगोळे, साहेबांचे ओटे अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या जागेची अगदी सोप्या भाषेत पण अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. ती माहिती शिक्षकांनी अगदी तळमळीने विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचवली. प्रसंगी त्यांनी बोर्ड-पेन्सिलचा हि वापर केला. मुलेसुध्दा अगदी उत्साहाने माहिती ऐकून सकारात्मक प्रतिसाद देत होते. गडफेरी दरम्यान त्यांना खाऊ वाटप करण्यात आला तर फौंडेशनचे सदस्य गार्बेज बॅग घेऊन गडावरील कचरा साफ करत होते. हे पाहून विद्यार्थ्यांनीसुध्दा स्वतः कुठेही कचरा केला नाही व सोबत नेलेला खाऊचा कचरा परत आणला. असे मिळून ३ पिशव्या कचरा गोळा करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे या दौऱ्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या. यापूर्वी गडकिल्ले फिरलो पण किल्ल्याबद्दल अशी माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फौंडेशनच्या सदस्यांना एक वेगळेच समाधान देऊन गेले..
दोन-अडीच तासाच्या भ्रमंती नंतर सर्वांची हॉटेलमध्ये भोजनाची व्यवस्था केली होती. यानंतर विद्यार्थ्यांना समुद्रकिनारी नेण्यात आलं. समुद्रकिनारी खेळताना आनंदित झालेल्या मुलांनी 'बम बम भोले' या गाण्यावर अप्रतिम असा मस्तीत डोलत केलेला डान्स पाहून तेथे उपस्थित फौंडेशन च्या सर्व सदस्यांच्या भारावून गेलेल्या चेहऱ्यावर हसू तर आलेच पण डोळेही पाणावलेले होते. गाणे ऐकू येत नसले तरी समोर उभ्या असलेल्या शिक्षकांच्या छोटयाश्या इशाऱ्यावर ते विद्यार्थी सुंदररित्या नृत्य करत होते. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी बोटिंगचा अनुभव घेतला. समुद्रात थोडं आत गेल्यानंतर इशाऱ्यानी त्यांनी इथे थोडावेळ थांबू असे सांगितले. कारण विचारताच मासे पाहायचेत असा इशारा केला आणि या चिमुकल्यांच्या न मारलेली हाक ऐकून २/३ डॉल्फीन्सनी दर्शन दिलं. डाॅल्फीन्स पाहून त्यांच्या आनंदाला पारावाराच राहिला नाही. दुपारी ४.३० वा गोड आठवणी घेऊन विजयदुर्गवरुन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत गगनबावडा इथे क्षणभर विश्रांती, चहा घेऊन ७.३० च्या सुमारास शाळेच्या दारात हा दौरा संपला.
आयुष्यात प्रत्येकाला वाटत असतं कि "माझ्या आयुष्यात केवढ्या अडचणी आहेत, माझ्याच वाट्याला सगळी दुःख, कष्ट आलेत, मलाच सगळं 'ऐकून' घ्यावं लागत." पण या मुलांचं आयुष्य, यांच्या घरच्यांना होणार त्रास, यांच्या शिक्षकांना त्यांना घडवण्यात येणाऱ्या अडचणी, कष्ट याचा विचार केला तर आपण जगत असलेलं आयुष्य किती सुखसमाधानाचं आहे पण आपणच त्याला त्रासदायक समजतो, याची जाणीव करुन देणारा हा दिवस फौंडेशनच्या सदस्यांना खुप काही शिकवून गेला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी शाहू युथला मित्र-परिवार, हितचिंतक, सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तींकडून तसेच वि.म. लोहिया शाळेचे शिक्षक, कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य मिळाले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाहू युथ च्या विजय अग्रवाल, अमित नलवडे, संदीप रसाळे, शरद पाटील, अमरसिंह पाटील, प्रसाद वैद्य, रोहन हातकर, निलेश शिंदे, सुरज शिंदे, शेखर घोरपडे, अमित वायकोस, ऋषिकेश देसाई, शंतनू मंगसुळीकर, प्रशांत देसाई, विनायक शिंदे, नरेश इंगवले, अजिंक्य माने यांनी परिश्रम घेतले तर कुलदिप साळोखे, रोहन जाधव, राज माने, विकी मोहिते, शंतनू मोहिते, प्रदिप देसाई, डॉ अमर देसाई, अजित शेवरे, विनायक संकपाळ, अजिंक्य सुर्यवंशी व सर्व शाहू युथ सदस्यांचे सहकार्य लाभले..
-written by Sushant harale
Watch kolhapuri Gul History Video
• Footprints of KOLHAPUR...
#kolhapur #kolhapurrepublic
Like Share & Subscribe to Our Channel Kolhapur Republic